Wednesday 15 June 2022

फेरा

(१)

 आपल्यातलं माणूस आपल्यातून जातं, म्हणजे काय होतं? या क्षणी असलेलं त्या क्षणी नसतं, कुठे जातं? 


वचनं, स्पर्श, सवयी, स्वप्नं यांचं काय होत असेल? 

मनाचा अनंत व्यापार क्षणात कसा थांबत असेल? 


शास्त्र सांगतं शरीराची होत असते माती अन् राख, 

कुठे जाते पण सांगा , मनामधली अमीट आस? 


आपल्यातला एक चेहरा गायबच होतो थेट! 

कधीतरी कुठेतरी होत असेल का पुन्हा भेट ? 


आत्मा म्हणे अमर असतो, जन्म-मरणाचा फेरा असतो, 

फेऱ्यांमध्ये काय साधतो ? मीपणाचा दंभ मिरवतो!  


असतील कळत का सगळी गुपितं पैल तीरावर?

असतील लागत सगळे संदर्भ घडलं जे जे आजवर? 


देव भेटल्यावर आपल्याशी काय बरं बोलत असेल?  

थकल्या जीवाची ऐकून कहाणी की नुसता मंद हसेल ? 


पुण्य ज्याला म्हणतो आपण, पुण्यच असेल का त्याच्या लेखी ? 

की पापाचा घट भरल्यावर झालेली असते गच्छंती?  


-०-०- 

(२)

 स्वर्गातील सुख उत्कट भोगुनी, 

आत्मा जाई जन्म विसरूनी, 

सृष्टी मधला व्यर्थ पसारा,

नकोच म्हणे जाणे फिरूनी। 


तिथेच प्रकटे मायादेवी, 

भाग्य कोरते हळूच भाळी, 

फिरून भूवरी धाडून देई, 

नव्या शरीरी नवी कहाणी... 


परतून पुन्हा जग संसारी या, 

बाळ चिमुकले हमसून रडते, 

पुन्हा उसासे, तीच रहाटी!

खेळावरती खुदकन हसते! 


                  - डॉ अतिंद्र सरवडीकर

शाळा

 

शाळेच्या वाटेवर सुखाचा फुलोरा, 
इवल्याश्या बाळमुठीत सुटणारा पारा । 

आठवणींची गर्दी होते जीवाचं पाखरू, 
चल दोस्ता सोबतीनं त्याच बाकावर बसू  । 

अंगत - पंगत, सहली, रंगल्या उदंड, 
किती पैशात कुठे आता मिळती हे आनंद? 

तिथली शिकवण, साठवण, मज्जा, 
जीवनाचा भाग बनते कायमचा सर्वांच्या। 

आठवणींची भरली ओंजळ आयुष्याला पुरते, 
कुपी उघडता अत्तराची कण कण घमघमते । 

धावत्या काळात हे विसाव्याचे बिंदू ठरती, 
रणरणत्या उन्हात जणू चांदण्या लुकलुकती । 

गेले ते गेले न मिळते परत ! 
परी शांत एका क्षणी तोच चाफ्याचा दरवळ... 

                                      - डॉ अतिंद्र सरवडीकर

Tuesday 14 June 2022

तुका झाला हो मंदिर...

तुका झाला हो मंदिर, रोम रोमी पांडुरंग, 

कसे चालता बोलता, घुमू लागले मृदुंग  ।

त्या मृदुंगाच्या नादी, लावतो समाधी, 

गजर घुमवी, विठोबा रखुमाई। 

घर फुंकले सहज, पोरा बाळा नागविले, 

विठ्ठलाने का उगाच, त्याचे अभंग तारियेले ! 

जन निंदती नासती, घाव वर्मीचे घालती, 

सारे देखोनी पाहुनी, थरारते रखुमाई । 

कष्ट सोसतो अनंत! तरी जीव साधा भोळा, 

त्याच्या भावाचा भुकेला, पंढरीचा लेकुरवाळा। 

तळतळून हाकी, संसाराचा गाडा, 

बसता उठता आवली शापते विठ्ठलाला । 

तुका किर्तनी बैसला, सवे विठू नादावला, 

शब्द - भाव - रस घट, जनी वाटून टाकला।

त्याच्या शब्दात अमृत, वेद शरण होतात, 

उरा उरी भेटण्यास, थेट विठोबा देहूत । 

जिणे वादळी प्रपात, तरी नामाचाच छंद, 

त्याच्या ओढीनेच अगा, झुरलाय शिरिरंग। 

त्याच्या प्राणातला टाहो, पार आकाशी भिडला, 

भक्तिभावात विरून, तुका वैकुंठी चालला ।  

दुजाभावच संपला, तुका विठूत निमाला, 

त्याच्या भक्तीची पताका, तिने कळस गाठला। 

तुका झालासे कळस, ज्ञाना पायासी आधार, 

नामा चोखा गोरा जना, मंदिराच्या भिंती चार। 

ऐसे मंदिर ठाकले, त्यात वास करी विठू, 

जग तेथून चालले, म्हणूनची नित्य स्मरू। 

                - डॉ अतिंद्र सरवडीकर

Saturday 11 June 2022

ऋतू पावसाळी

 

ऋतू पावसाळी भुई रंग वेडी, फुलारून जाती वाटा अशा, 

मातीतले अत्तराचे फवारे, नीलाम्बरी दशदिशा कोंदल्या...  


निवतो असा देह या जल तुषारी, भेगाळल्या भूमी पान्हावतो, 

कशा नीळ राशी धरुनी उशाशी, मुक्यानेच अंकुर फोफावतो !  


फुलती कळ्या मोरपंखी दलांनी, पुन्हा मीच माझ्यात हुंकारतो, 

दिशा मुक्त झाल्यात, इंद्राचाप पाण्यात, ओलांडुनी त्यास मी चालतो...


अश्या मंद वाऱ्यात ढगाआड ताऱ्यात तुझा स्पर्श वळिवात सामावतो, 

किती दूर आलो जरी या प्रवाही, उरी मोगरा तोच गंधाळतो...  

 - डॉ अतिंद्र सरवडीकर 

अर्घ्य

 वेदनेची गाठ सुटू दे, भावनेचा शब्द फुटू दे, 

तुझिया स्मरणात माझे, अंतरीचे झाड फुलू दे। 


धडपडीला साद मिळू दे, फक्त पाठी थाप असू दे, 

जाई क्षितिजा पार ऐसी वेगळाली वाट दिसू दे। 


हा उन्हाचा दाह शमू दे, श्रावणाच्या सरी पडू दे, 

सावलीला आणि इलुसा, स्वप्न भरला गाव रमू दे। 


निर्झरांचा संग असू दे, प्रीत वेडी साथ जुळू दे, 

भागण्या तृष्णा जीवाची ओंजळींचे दान मिळू दे। 


जीवनाचा अर्थ कळू दे, नित्य भोळा भाव वसू दे, 

अर्घ्य व्हावी ईश्वराला, ऐसी देहयात्रा घडू दे । 

 - डॉ अतिंद्र सरवडीकर

निंदिया

 बिस्तर की झुर्रिया जानती तो है सब !


 दिल दुखने पर आयी अकेली सी निंदिया,

 बीच रात उडी बैरन निंदिया,

 किसी को याद करती बेकरार निंदिया,

कल के ख्याल से उजड़ी आज की निंदिया।  


दादी की आवाज पहनी कहानीवाली निंदिया,

एक दूसरे के लिए जागती ख्यालभरी निंदिया,

तेरे मेरे साथ की प्यारी सी निंदिया,

सुबह आँख से न उतरती बोझल निंदिया।  


अनजाने रास्तों की शक़्लोंभरी निंदिया,  

डर से डरती घबराती निंदिया,  

कुछ खोने के ग़म से तरसती निंदिया,  

पापा जाने के बाद छाई काली सी निंदिया।  


क्लास रूम में आती नटखट निंदिया,  

सफर में आती जागनेवाली निंदिया,  

हाथो  में हाथवाली सुकून भरी निंदिया,  

माँ के आचल की छाव भरी निंदिया।   

                           -  डॉ अतिंद्र सरवडीकर 

-0-