Monday 23 November 2020

क्षण तृप्तीचे

दु:खाचा मेघ सावळा, अन्  सृजनाचे रंगीत पाणी... 

कळी निरागस, अबोध, कोमल, वावटळी अन् वारा निर्मम... 

प्रेमाची ओढ अनावर, अन् विरहाची रात्र काजळी... 

कुठे युगुलांचे धुंदीत नर्तन, कुणा भाळी अन् कसे एकाकीपण? 

कुठे सांडते शिवार दाटून, कुणी भुकेेले  तसेच व्याकुळ... 

प्रारब्धाचा असला वाटा, सांग कुणी का घेते वाटून?

कुणा सापडे पाचू माणिक, कुणा मुखी कनकाचा चूषक

अन्नोदक शोधत शोधत, कड्या कपारी कोणी भटकत...  

प्रश्न पडे मग कोण मांडते? विरोध भरले असले जीवन?

पाहत बसतो का उगाच गंमत? कळसूत्रीचा वरचा मालक? 

मग वाटते स्वस्थ बसावेे, काय चालले गप्प पहावे! 

नियतीचे फासे ओघळते, पडे दान हसूनी स्विकारावे

साचल्या इच्छा, रूतले मी पण, त्याच्या ठायी सोडून द्यावे,  

आपण आपले कार्य करावे, प्रयत्नांचे अर्घ्य अर्पावे 

दु:खालाही मग सुगंध यावा, वेदनेलाही यावी लज्जत! 

हसता हसता एका वळणावर, क्षण तृप्तीचे यावे अलगद... 

- डॉ अतिंद्र सरवडीकर




फुलोंकी ऋत

फुलोंकी ऋत है ये फुलोंके मेले      
म फुलोंमे सोते है फुलोंमे जगते। 

दुनिया बनी है शोर-ए-गुल का दरिया
हम अपने मे मस्त है धून अपनी गुनगुनाते

वो भवरों की टोली आती है खिलखिलाते, 
हम सबसे है मिलते पर तनहा रह जाते

वह जुगनू के साये पल मे झिलमिलाते, 
जैसे यादों के पन्ने खुलते मिट जाते 

वह फुलोंके वादे वह फुलोंके चर्चे, 
ख्वाबोंकी सिलवट पे फुलों से चेहरे 

- डॉ अतिंद्र सरवडीकर

Saturday 20 June 2020

स्वामी

स्वामी तुम्हासाठी मी एक गीत गाते
तुम्हा चरणी माझी भाव फुले वाहते...।।धृ।।

भिऊ नको भिऊ नको, पाठिशी राहिले,
माऊली होऊनी मजसाठी धावले,
चिंता माझी दुःख माझे तुम्हा पायी ठेवते...।।१।।

प्रेम दिसे डोळा, तेज ओसंडते,
पाठिवरी हात आणि मना बळ देते,
इच्छा केल्या पूर्ण, मार्ग मज दावले... ।। २।।

गुरू चरणी माझे मन हे स्थिरावले,
मानस पुजेस माझ्या गोड तुम्ही मानले,
धन्य जन्म वाटतो, अश्रू नेत्री दाटले...।।३।।

                            - डॉ अतिंद्र सरवडीकर

Friday 22 May 2020

बंद दारे ...



भागलेल्या जीवा, नाही क्षणाचा विसावा, 
तापलेल्या डोई, वाहे भार संसाराचा, 

जन्म दिलास देवा, आता मरायचे कसे ? 
विषारी हवेतही घर आठवे... बोलवे...

वाट दूर दूर जाई, जसा सर्प पहुडेला,
दोन पाऊले सानुली, त्यात नुपूर दबलेला,

झपझप चालू, मैल हजार राहिले! 
कुणा हाती बाळ, कुठे थकले जोडपे, 

तहानलेला जीव बाप्पा, पोटी नाही दाणा! 
चोची वासून चालले...  थवे...  दिगंताला... 

भर मध्यान्हीच्या वेळी, गाव ओसाड झोपले!  
काळ रात्रींच्या मिठीत, जणू चैतन्य लोपले,  

अडलेल्या लेकीला या, घ्या गं आडोशाला! 
धीर धर बाई जन्म निखारा पेटलेला, 

हायवे कडेला तिचा तान्हुला जन्मला!
आता विचारावे कुणा? हा कोण्या राज्यातला?

किती सोसावे कळेना, किती जोडले जुळेना, 
गर्व धर्म जाती रिती मात्र जळता जळेनात 

कुठे येणे कुठे जाणे? चुकवावे कसे देणे? 
देह वेशीपाशी आला आणि बंद झाली दारे... 

                             - डॉ अतिंद्र सरवडीकर






Sunday 10 May 2020

डॉ गोविंद शंकर काणेगांवकर, म्हणजे माझा सख्खा मामा, गोविंद मामा! आपल्या प्रचण्ड हुशारीच्या बळावर डॉक्टर होऊन 1960 च्या दशकात इग्लंडमध्ये स्थायिक झाला. जगातल्या श्रेष्ठतम नेत्र चिकित्सकांमध्ये मामाची गणना होते. जेव्हा भारताबाहेर स्थायिक होणं ही अतिदुर्मिळ गोष्ट होती तेव्हा तो इंग्लंड मधला एक अतिशय सन्मानीत नागरिक होता. इतका की इंग्लंडच्या राजवाड्यातून त्याला मेजवानीसाठी आमंत्रण असे. हाईथ या केण्ट परगण्यातल्या टुमदार गावी त्याचा एखाद्या किल्ल्यासारखा असलेला 30-35 खोल्यांचा प्रचंड बंगला, दिमतीला असणार्या रोल्स रॉईस सारख्या गाड्या त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. पण ही काही मामाची पूर्ण ओळख नाही!!! त्याचा प्रेमळ स्वभाव आणि समाजाच्या मदतीला, विकासाला स्वत:ला वाहून घेणं ही त्याची खरी ओळख आहे... मामाने मागची अनेक दशकं भारतातल्या शेकडो सामाजिक संस्थांचा, व्यक्तिंचा स्वत:हून शोध घेऊन मदत केली आहे, लहान गावातल्या दवाखान्यांना महागडी यंत्र, उपकरणं घेऊन दिली आहेत! तो गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो, पण ती करताना तो काय अट घालतो माहीत आहे? तो सांगतो हे पैसे मला परत करू नका पण अट ही की तुम्ही पुढे जाऊन एखाद्या गरजू विद्यार्थ्याला अशीच मदत केली पाहीजे. हे मदत करणारे हात घडवणं झालं!! त्याने ज्या संस्था आणि व्यक्तिना वैयक्तिकपणे अशी मदत केली आहे, तो आकडा म्हणे 50 लाख रूपयांपेक्षा जास्तय! तुम्ही जर त्याला भेटलात तर त्याचा साधेपणा पाहून तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलत आहात! भारतीय परंपरा, संस्कृति, देव, पूजा यांवर त्याचा दृढ विश्वास आहे. तो पौरोहित्य शिकलाय आणि इंग्लंड मध्ये चक्क लग्न सुद्धा लावलियत अाणि पुरोहिताची गरज भागवली आहे. मामाला मोलाची साथ देणारी आमची विजया मामी, बार्शी सारख्या छोट्या गावातून आली आहे, तिथून झालेली पहिली डॉक्टर! आज पन्नासहुन जास्त वर्ष इंग्लंडमध्ये राहून, स्त्री रोग तज्न्य म्हणून तिने भारदस्त कारकिर्द घडविली आहे. पण तिला कधीही साडी शिवाय कुठल्याही पोषाखात पाहिलं नाही. गणेश उत्सवात 50-50 लोकांच्या पुरणपोळीच्या जेवणाची व्यवस्था ती हसत हसत करत असते! लता मंगेशकर, भारतीय क्रिकेट टीम, शरद पवार यांसारख्या अगणित दिग्गजांनी त्यांच्या घरचा पाहुणचार घेतलाय... परवाच वयाच्या ऐंशीव्या वर्षी मामाने इंग्लंड मधल्या बेघराच्या मदत निधीसाठी कितीतरी किलोमीटर सायकल चालवली आहे. आज आम्ही सगळे अाणि मामा मामींचे 30-40 स्नेही बार्शीला आलोय, निमित्त आहे मामा मामींच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस... ! मला मामाची कितीतरी रूपंं आठवतायत, लहानपणी भेटवस्तू आणणारा, अनोख्या गोष्टी, अनुभव सांगणारा, लंडन महाराष्ट्र मंडळातल्या माझ्या कार्यक्रमात माझा सुंदर परिचय करून देणारा आणि परवा माझ्या लग्नाच्या वरातीत बेफाट नाचणारा... ! भगवंताची यथासांग पूजा पार पडतीये अाणि थोड्या वेळात माझ्या गाण्याचा कार्यक्रम आहे... सकारात्मकता आणि प्रसन्नता आसमंतात भरून राहिलिये... 😊