Saturday 19 June 2021

संगीतातले स्त्री पुरुष

 संगीतात लिंगभेद असतो का ? त्या आधारावर संगीताच्या स्वरुपात, प्रकटीकरणात सांगितीक द्रष्ट्या काय भेद घडतो? यांतली सिमारेषा कितपत ठळक असते ? आजच्या महिला दिनानिमित्त हा जरा वेगळा विचार. 

--------------------------------------------------------------------------

आजच्या अभिजात संगीताला व्यापून राहिलेला "ख्याल" हा गानप्रकार सुरवातीला 'जनानी', म्हणजे स्त्रियांसाठी बनवलेला गानप्रकार म्हणून ओळखला जायचा म्हणे. "सदारंग" हा ख्यालाचा आद्य रचनाकार महम्मदशहा राजाच्या दरबारात होता. राजाची मनधरणी करायला त्याने ख्यालाच्या रचना करायला सुरूवात केली. या रचनांचा विषय स्त्री केंद्री असायचा. स्त्रिया महम्मदशहा राजाला प्रियतम मानून त्याची मनधरणी करतायत, त्याला रिझवतायत, त्याच्या विरहाने व्याकुळ होतायत अशा अर्थाच्या या रचना होत्या. हा ख्याल रुजला, लोकप्रिय झाला. या विषयाने ख्याल गानप्रकाराचा इतका ताबा घेतला, की सदारंगाला जाऊन शतकं उलटली तरी आजही ख्यालाच्या ' नायिकेची भूमिका मांडणार्या' रचनाच गायल्या जातात, रचल्या जातात. 

अल्लादियाँ खाँ, फैय्याज खाँ, वहिद खाँ, बडे गुलाम अली खाँ यां सारखे भरदार दाढी मिश्या राखणारे, व्यायाम करून एखाद्या पहेलवानासारखं शरीर कमवलेले गायक सुद्धा अशा नायिकेच्या भुमिकेतल्या बंदिशीच गात असत. भले त्या मागे मधुरा भक्तीचा भाव असेल, पण विषय नायिकाप्रधान होता हे मान्य करावं लागेल... 

ठुमरी हे तर मुर्तिमंत लालित्य ! तिथंही परत स्त्रित्वाचाच आविष्कार. ठुमरीचे बहुतेक रचनाकार पुरूष असूनही नायकाच्या तोंडी शोभेल असा विषय तिथे नाहीच. पुरूषही विरहाने व्याकूळ होतातच की, पण त्याची फारशी दखल कुणाकडुन घेतली गेल्याचं दिसत नाही. 

नाट्यसंगीताच्या प्रांतात बालगंधर्वांसारख्या अद्वितिय गायक नटाने कायम स्त्रीभूमिका केल्या. सवाई गंधर्व, दिनानाथ, मास्टर कृष्णराव, छोटा गंधर्व हे सगळे स्त्री भूमिका उत्तम निभवत...

सुगम संगीतात तर मला आश्चर्याचे अनेक धक्के वारंवार बसतात! सुगम संगीतातल्या अनेक संगीतकारांवर स्त्री अावाजाचा, तिच्या अभिव्यक्तीचा जबरदस्त असर पडलाय असं मला फार जाणवत आलय ! तुज मागतो मी आता, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, भय इथले संपत नाही ही सगळी पुरूष भुमिकेला साजेशी गाणी ना ? मग ती स्त्रीच्या आवाजात कशाला ? अगदी सुहाग रात है घुंघट उठा रहा हु मै, या असल्या ओळी सुद्धा स्त्री आवाजातच लोकांना ऐकवायची सवय आपल्या संगीतकारांनी लावलीये. मला आठवतं, कॉलेजात असताना एकदा संगीतकार सी.रामचंद्र यांच्या गाण्यांची एकदा स्पर्धा होती. तेव्हा असं लक्षात आलं होतं की त्यांच्या शेकडो गाण्यांमधे अगदी तुरळक पुरुष गीतं आहेत. असं अनेक संगीतकारांबाबतीत आहे ! 

इतर अनेक युगल गीतात पुरूष गायकांना येणार्या ओळी तुलनेने साध्या असतात. याचं शुक्रतारा सारखं उदाहरण आहेच (बाईला 2 कडवी आणि पुरूषाला एकचं, असं का ब्वा !!!!) 

 टिव्हीवरुन ओसंडून घरांत शिरू पाहणार्या अगणित सिरीयल्स पैकी किती थोड्यांची शिर्षकगीतं पुरूष आवाजात असतात?

स्त्रीचं असहाय होणं, दुर्बल असणं, प्रेमात पडणं, अल्लड असणं खूप वेळा संगीतबद्ध झालंय, पण पुरूषांचं गंभीर असणं, आतुन हळुवार असणं, तुटून प्रेम करणं, रांगडं असणं, जीव तोडुन जवाबदारी उचलणं, मवाळ असणं, लाजाळु असणं, वीर असणं किंवा रागिट असणं ही केवढी जास्त एक्सप्रेशन्स आहेत! ती कधी आणि कशी समोर येणार ? 

 जीवलगा, या चिमण्यांनो, जाहल्या काही चुका, भेटी लागी जीवा किंवा हिंदीतल्या लग जा गले सारख्या गाण्यांचा स्तर गाठू शकतील अशी पुरूषांची गाणी खरचं खूप कमी सापडतील. 

अलीकडे तर पुरूषांची गीतं म्हणजे केवल उंच उंच स्वर लावायचे एवढं एकच एक्सप्रेशन उरत चाललय मग तो सूर 'निरागस' असो वा 'दमलेला'.. 

आपल्याकडे हे दालन थोडं अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक Sensitivityने धुंडाळलं गेलं पाहिजे असं वाटतं.


                                                    - डॉ. अतिंद्र सरवडीकर 


--------------------------------------------