Wednesday 7 June 2017

ओंजळीतली फुलं

काटे अलगद बाजूला काढत
माझ्या ओंजळीतली फुलं
दुसर्या ओंजळीत सोपवताना,
माझा हातच होतोय फुलांचा
सुगंधानं दरवळणारा,
अन् मखमली स्पर्शाचा...

काही ओंजळी ठेवतायत माझी फुलं जपून
तळहातांच्या रेषांसारखी !

काहींना पत्ताच नसतो की ही फुलं आहेत !
जपून ठेवली पाहिजेत याचा !

माझ्या फुलांनी मात्र सुगंधित केलंय त्यांच्याही ओंजळीला... त्यांच्याही नकळत...

जेव्हा अशा अनेक ओंजळी लाभतील,
तिथं विसावतील फुलं,
तिसर्या ओंजळीत जाण्यासाठी...

तेव्हा बनेल गाणं !
सुगंधानं दरवळणारं...
खोलखोल झिरपणारं... आणि आकाशाला पोहोचणारं...

        - डॉ. अतिंद्र सरवडीकर

*(हिंदी रूपांतर)*

काँटे  ध्यान से  हटा कर मेरी अंजली के फूल  दूसरे की हथेली पर सौंपते हुए मेरा हाथ ही होता जा रहा है फूलों का! 
खुशबू से महकने वाला और फूल से  स्पर्श सा.... 

कुछ  हथेलियाँ   रख रही हैं, मेरे फूल जतन से 
हथेली  की लकीरों जैसे...  
कोई समझ ही नहीं पाते, यह फूल हैं, इन्हे जतन से रखना होगा ! 

लेकिन मेरे फूलों ने महकाया है,  उनकी भी हथेलियों को...  
उनकी समझ से परे...    

ऐसी कई अंजलिया साथ होंगी   
फूल वहाँ आराम से ठहरेंगे...  कुछ पल,
किसी तीसरी हथेली पर जानेसे पहले... 

तब बनेगा एक गीत 
महकने वाला 
अंतरात्माओं को  को छू कर 
आसमान तक पहुँचाने वाला..

#गुरूपौर्णिमा #gurushishyaparampara  

Wednesday 31 May 2017

दादरकर बाईंच्या संस्थेत गाणारा एक खड्या आवाजाचा मुलगा अशी त्याची मला ओळख होतीच, पण मैत्री 2013 मध्ये झाली. खरंतर आमच्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात Mayur एम.ए. करत असताना मी तिथे शिकवायला होतो. पण तरी सुद्धा आमच्यात झाली ती घट्ट मैत्री..!!! त्याला कारण मयूरचा मोकळा ढाकळा स्वच्छंद स्वभाव, माझ्या अगदीच विरूद्ध... मी मयूरमुळे भटकायला शिकलो, काहीही खरेदी करायची नसताना मॉलमध्ये फिरायला जाता येतं, तिथले सेल, ऑफर्स हेरून शर्ट पँट्स, सँडल, बूट यांची बेगमी करायची असते, एखाद्या दिवशी उगीचंच काम धंदा सोडून बिर्याणी हाणायचा बेत करायचा असतो, अजिबात ओळख नसलेल्या व्यक्तिशी गप्पा मारता येतात, स्थल काळ विसरून कुठेही दणकून गाता येतं, हे सगळं मी त्याच्या सोबत प्रथमच अनुभवलं (सगळंच इथं लिहितं नाही 😉)... आमच्यात कडाक्याची serious भांडणं होतात, माझ्या ईगोच्या विनाकारण पदोपदी चिंधड्या केल्या जातात, अगदी एकमेकांचं तोंंड पाहणार नाही असं म्हणून आम्ही निरोप घेतो...
 परवा त्याच्या लग्नातही मी त्याला एकदाही शुभेच्छा दिल्यात किंवा congratulations म्हटलं असं मला आठवत नाही. कसल्याही स्वरूपातली भेटवस्तू द्यायची नाही असं तर मी ठरवूनच गेलो होतो... लग्नाच्या आदल्या दिवशी 15 मे ला त्याचं संगीत होतं.. त्याचे अनेक मित्र त्यात उत्तम गायले.. माझ्या वाट्याला शेवटची भैरवी आली... खरंतर त्याच्या आदल्या दिवशी 14 ला माझा खूप तणावाचा, महत्वाचा, मोठा कार्यक्रम झाला होता आणि जागरणही... पहिले चार दोन स्वर लावले आणि भैरवीचा ओळखीचा सुगंध जाणवायला लागला... आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही हसलो...
मातीत, चांदण्यात, वार्यावर, पाण्यात अन् गाण्यात आपल्या माणसांचे असे  किती हुंकार मिसळलेले असतात कोण जाणे!  नुकत्याच कुणा लेखिकेेच्या ओळी वाचनात आल्या होत्या...
"आपण काय करू शकतो? तर आपल्या वाट्याला आलेला जीवनाचा, काळाचा, पृथ्वीचा एवढासा तुकडा सुंदर बनवू शकतो!"
आपल्या मैत्रीनं आपला हा एवढासा तुकडा विलक्षण सुंदर बनवलाय दोस्ता...

फक्त शुभेच्छा... 😊

- अतिंद्र सरवडीकर

PS - Missing you Rohan Dangat and Nikhil Nik

Wednesday 19 April 2017

राधार्पण


ऐन दुपारी कदंबाखाली, कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी 
रंग उधळूनी रास रचुनी, गोफ गुंफती हरी भोवती 

इतक्यात सर्रकन अवचित रुतला, कमल चरणी हरीच्या काटा !!
राधा राधा सत्वर वदला, घननीळ नेत्री अश्रू दिसला !

सुंदर भामा ,कोमल रखमा, जांबुवंती अन वदली कमला 
बसता उठता राधा राधा! नसे जागा का आमुच्या प्रेमा ? 

सोळा शृंगार तुझ्याचसाठी, घास मुखी तव आमुच्या आधी,
दारी लाविला पारिजात हा, सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी !

चिडली भामा, रुसली रखमा बरे न हे 'राधेला' विसरा 
कोण गोपी ती ? कुठल्या घरची ? आम्हा सामोरी का तिची  मुजोरी  ?

नकोस फसवू , शपथ तुज सखया, कलंक न हा भाळी लागो तुझिया,
उठले हरी ... दूर जाहले ... टक लावूनी..  अभ्र पाहिले ... 

शांत घटका सरली अन् मग, मंजुळ वाणी बोलू लागले 
वृंदावन जेव्हा टाकिलें, अन् सोडिले राधेला, पुन्हा न होणे भेट, माहित झाले भाबडीला 

माग म्हणालो आज काहीही, माझी आठवण... खूण प्रीतीची...
बोलली राधिका झुकवून डोळे, कधी न मागिले आज मागते..

सल जरी इवला, रुतला तुजला डंख तयाचा व्हावा मजला ! 
कमलदल पावलांना तुझिया पायघड्या ह्रदयीच्या व्हाव्या 

चाललास जरी दोन पावले, क्षेम कुशल तव मज धाडाव्या 
म्हणून सखये ओठी राधा दोन तन मने एकच गाभा  

पाऊल जरी मी एक ठेवले ती भू नाही ग काळीज स्मरते !!
म्हणून सांगतो प्रिय सखी तू राधा मात्र माझे मी पण... 

राधे इतकी प्रीती मजवर आहे कुणी का केली सांगा ? 
म्हणून सांगतो निजभक्तांना कृष्णा आधी बोला राधा... 

प्रितीचे ते सुंदर मंदिर कशी करावी दूर आठवण ? 
राधा भरली कणा कणातून कृष्ण राहिला फक्त राधार्पण... 

- डॉ. अतिंद्र सरवडीकर ©