Saturday 5 April 2014

साठीच्या गोखले काकूंनी गाणं शिकायला सुरुवात केली !!  केव्हा पासनं  शिकायचं राहून गेलय ! कित्ती आवडत गाणं  ! लहानपणी बाबाना आवडत नाही म्हणून आणि तरुणपणी घरचा गाडा एकहाती हाकताना उसंतच मिळाली नव्हती… शोधता शोधता शेवटी एक गुरुजी मिळाले  … त्यांची अमकी फी ढमके वार वगैरे ऐकतानाच आतून लकेर आली ' येरी आली पिया बिन, कल ना परत मोहे घरी पल छिन गिन ' धावल्याच तिकडे…  अडखळल्या दाराशी…  आणि तिथेच बसल्या … डोळ्याला लागलेल्या धारान मधून जसा सगळा भूतकाळच वाहून गेला…  



संगीत एम.ए. च्या वर्गात नव्याने दाखल झालेली U.P. बिहार कडची मुलगी …वय जेम तेम २२ …  डोक्याला कसल्याश्या वासाच तेल आणि एकूण अवतारचं ! तिच्या येण्याने झालेला खुस्फुसाट पहिल्याच दिवशी तिला वर्गाच्या कोपरयातली अडगळ बनवून गेला, वर्ष सरून गेल, पण तिचा काळी एकात सणसणीत लागणारा 'वरचा सा' कुणी ऐकलाच नाही… फेल झालेली मार्क लिस्ट घेताना सगळ्याना आवर्जून सांगत होती - आप सब बोहत अच्छा गाते हो … परत तोच खुस्फुसाट ,,,, 


मधुकर काका थोरल्या खानसाहेबांचे शिष्य, एक काळ आकाशवाणीवर गाणारे पण आता आवाज कापतो … तशात हि तास भराचा रियाझ सुटत नाही … ती ढंगदार गायकी आणि त्या अनमोल बंदिशी… आज सकाळ पासून जरा गडबडीत आहेत कारण त्यांच्या कडे शिकायला नवा शिष्य येणार आहे. तयार होऊन, थोडं  गाउन पाहिलंय … मातृवत्सल शिष्य आपल्या 'मम्मी' बरोबर पोहोचलाय … मुलाच तोंड फाटे पर्यंत कौतुक सांगून झाल्यावर बाईनी जरा उसंत घेतली … बुवांनी तानपुरा काढल्या सरशी बाई म्हणाल्या… क्लासिकॅल वगैरे बेस म्हणून करायचं बाकी आमचा सोनू फिल्म म्युजिक गातो… यु नो प्लेब्याक न ऑल … !! मधुकर काका म्हणाले पण याचा आवाज आमच्या गायकीला एकदम सूट आहे… त्याचा कल हि क्लासीकल गाण्याचाचा आहे ... नाही हो त्या पेक्ष्या आमच्या सोनू ला फोक शिकवा… आणि हो सगळ हाय पीच पायजे हं !  काका अजून संभ्रमात आहेत नक्की काय शिकवायचं याच्या ! 


अवघ्या २४ वर्षाचा महेंद्र मोडनिंब हून मुंबईत आलाय … गाणं शिकायला ! त्याचे आवडते उस्तादजी मुंबईत राहतात … सहा महिने तर फोनवर पण आले नव्हते आणि  कालच आले तर म्हणाले आजाव बेटा… हा तरंगत निघालाय… शेवटी भेटले उस्ताद … याचा आनंद; अश्रू  सगळ्यालाच उधाण … अखेर उस्ताद बोलले, बेटा महिने कि ६००० फी, गंडा बंधन के ८०,००० और रेहने का अलग… महेंद्र आजकाल शिपाई म्हणून काम करतो … शाळेतली पोर म्हणतात महेंद्र शिपाई फार छान गातो …  


तबला वाजवणार्या मुली तश्या कमीच पण राजश्री मोठ्या जिद्दीने शिकली, पुरुषांना लाजवेल असा वजनदार हाथ आणि तयारी… लग्न होऊन इतक्या लहान गावात पाठवणी झाली कि तिथे संगीताचा मागमूस हि नाही… नवरा कधी शुद्धीत असेल तर घरात, नाही तर कुठे पडलाय ते शोधुन घरी आणायचं  … पण तश्यात हि रियाझ सोडला नाही … पर्वा विचारात होती मुंबई विद्यापीठात तबल्यात करसपोंडन्स  पी. एचडी. करता येईल का म्हणून ! 


त्यांना सगळे मामी म्हणतात वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा अंधेरी, बांद्रा कुठे कुठे जाउन गाण  शिकवतात… आवरून ठेवलेली गिरगावातल्या चाळीतली दोन खणाची खोली खांद्यावर घेतलेला  पदर, ठसठशीत कुंकू आणि न विसरता माळलेला गजरा… मामींचे मिस्टर १५ वर्षापूर्वी घर सोडून निघून गेले ते आज वर कुणाला दिसले नाहीत … कारण काय होत तर किरकोळ घरगुती भांडणात वैतागून एकुलत्या मुलाने जाळून घेतल … एकदा प्रभाताईंच  गाणं आम्ही ऐकत होतो, अप्रतिम रागेश्री चालला  होता शब्द होते 'गिनत राही तारे, पिया ना आये, बिरहा सताये'  … मामींचे डोळे मिटलेले … त्या बंदिशीचे किती किती अर्थ लागले त्या दिवशी !


स्वातंत्र्या नंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या उ. बडे गुलाम अलि खान यांना पाकिस्तानात हिंदू देवतांचे उल्लेख असणार्या रचना गाण्यावर श्रोत्यांनी बंदी आणली होती. त्यावर बडे गुलामजीं, ‘जहा कान्हा नही। वहाँ गाना नही।।,’ असे म्हणून मैफील अर्धवट सोडून भारतात परत आले. या मध्ये कुठल्या धर्म पंथाचा संबंध नवता तर जुन्या व परंपरेने आलेल्या संगीताला बदलायला दर्शविलेला तीव्र निषेध होता …  धर्म, जात, पंथ, देश याहीपलीकडे जाऊन मानव्य, सलोख्यानी ओतप्रोत भरलेले संगीतासारखे दुसरे माध्यम नाही हे या लौकिक अर्थाने अशिक्षित कलाकाराने किती समर्थपणे दाखवून दिले !

  

संगीताची सामाजिक किवा मानसशास्त्रीय बाजू माझ्या नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलाय… व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर आपण सर्वसामान्यपणे सुद्धा म्हणतो पण या प्रकृतीना जेव्हा संगीता सारख्या एका 'अमूर्त कलेची' जोड लाभते तेव्हा जे  काही घडते ते कधी कधी अनाकलनीय असतं  !  संगीत अमूर्त यासाठी कि या कलेच रंग, रूप सामान्यपणे  जाणवणं आवाक्या बाहेरच असतच पण कधी कधी काय चांगल हे ठरवण देखील अवघड असत ! या कलेत सर्वश्रेष्ठ, सगळ्यात उत्तम अस काही नाहीच मुळी जे काही असत ते त्या क्षणी कृपावंत होऊन संगीत नावाच्या शक्तीने दिलेलं उत्कट दर्शन !  माध्यम कुणी एखादा गायक, रचनाकार, वाद्य आणि अर्थातच हे जाणवणारा सहृदय श्रोता  ! 

 - अतिंद्र सरवडीकर 
(घटना सत्य आहेत. नावे बदलली आहेत.)

6-4-2014