Tuesday 12 February 2013

चंद्रकंस

चंद्र शांत रातव्यात
चंद्रकांत सावल्या
झाड झाड पान पान
चंद्रनील पाकळ्या ||

भारल्या सुरात जीव
तृप्त तृप्त गारवा
ये फुलून मोहरून
चंद्र सूर शुभ्रसा ||

चंद्र तोच रात तीच
तोच धुंद गंध हा
खोल खोल ये जुळून
चंद्रकंस बावरा ||

चंद्रपार राउळात
मंद दीप तेवढा
चंद्र्धून ये तिथून
अंतराळ भारला ||

श्वास स्पर्श जाहला
भास अर्थ जाहला
चांदण्यात हात अन
प्रीतपूर लोटला ||

- अतिंद्र सरवडीकर

नक्षत्र

घननीळ स्वरांच्या राशी
अडखळल्या कश्या मनाशी ?
मी एकटा उभा तिमिरात
जुळवीत हाक ओठाशी ||

विस्तीर्ण पसरला माळ
डोळ्यात दाटली नीज
चालणे तरी थांबेना
प्राणात अनावर ओढ ||

एकट कातर वेळ
तो निजला देवघरात
उजळण्या दु:ख जरासे
फुटला आर्त अभंग ||

श्वासात लयीचे झोक
कंठास सुरेल तहान
गात्रास लागण्या जोग
तालात बांधले
त्राण ||

ऐकता अनावर हाक
धावलो जरा बेभान
क्षितिजावर तुटका तारा
ओन्जळीत एक नक्षत्र ||

- अतिंद्र सरवडीकर...

भिन्नषडज

भिन्न वाटा जाहल्या रे
याद थोड्या राहिल्या
पान वेलीला सुनावे
भिन्न आता सावल्या ।

वळण वाटी भेटलेल्या
जीवलाव्या त्या खुणा
भिन्न गावे गाठताना
हाक घुमवीत राहिल्या ।

पायवाटा वेगळाल्या
हात हाती वेगळाच
गीत पुसण्या का कधीचे
भिन्न षड्जी लागल्या ?

वेचलेल्या स्मृतींच्या
गोठलेल्या पाकळ्या
बहरण्या प्राजक्त दारी
ओघाळोनी टाकल्या ।

भिन्न वाटा जाहल्या रे
याद थोड्या राहिल्या
पान वेलीला सुनावे
भिन्न आता सावल्या ।

--- अतिंद्र सरवडीकर

ज्ञानोबा

सहन सिद्धीचा हो योगी दु:ख कालिंदीच्या तीरी
शांत रसाला भरती गाढ लागली समाधी |

नवतरुण तेजाळ त्याला विश्व गवसले
महाशून्यात बैसला त्या पैस नाव दिले |

सा-या जगाचे गुपित बालपणीच जाणले
चालविली जड भिंत रेड्या वेद वदवले |

ज्ञानमित्र दीपाळता म्हणे विश्व हेचि घर
ओवी ओवीत गुंफले विश्व आर्त प्रकाशले |

कालातीत दिव्य तेज प्रकटून दु:ख भोगी
शांत अद्भुताची लेणी अश्रू अश्रूत खोदली |

किती साहिले बा त्याने सारे पारिजात केले
सडा ज्ञानाचा शिंपला सारे भरून पावले |

त्याने लावलेले तेच एक कैवल्याचे झाड
चैतन्याच्या गाभा-यात आजही पुंजाळत |

त्याच्या शब्दांची नक्षत्रे त्याच्या वेदनेचे दीप
त्याचा आठव दाटता विरे मोहाची जाणीव |

- डॉ अतिंद्र सरवडीकर