Sunday 29 December 2013

कुणाची तरी सोबत करायची म्हणून,
जीवाचा करायचा कणीकोंडा…
काळजावर तर नेहमीचाच
भला मोठा दगड धोंडा,
या पेक्षा प्रलयात द्याव ना झोकून स्वतः ला !
दुखाच्या गडद निळ्या लाटा झेलत…
त्या दुखालाहि नको का … कुणाची तरी सोबत ?


                                    - अतिंद्र सरवडीकर 
                                      (२९ डिसेंबर २०१३)

Saturday 28 December 2013

गीत व्हावे एक ऐसे
अंतराला स्पर्शणारे ,
नाद बिंदू वेचताना
अनंताशी पोचणारे ।
                            
या जिवाच्या घालमेली
त्या जिवाला सांगणारे,
दुख वेदनांतूनी फुलूनी
विश्व सारे गंधणारे ।

वेचितांना सूर सुमने,
फुल पानी जागणारे,
लाजणाऱ्या मुग्ध कलिका,
चंद्र बिंदू चुंबणारे ।

गंधवारा वाहताना
तरु – लतांना वेढणारे,
थाप पडता कडकडाती
रंध्र रंध्री धुंदणारे ।

अंधारल्या मनातुनी ,
एक पणती लावणारे,
दोन हृदये सांधताना ,
हात हाती गुंफणारे ।

सूर माझे शब्द माझे,
वाट माझी चालणारे,
नाद बिंदू वेचताना
अनंताशी पोचणारे ।

-        डॉ अतींद्र सरवडीकर 


ही आर्त विराणी कुठली ?
ही चंद्रपारची  वाणी ?
डोळा अलगद दाटे,
प्राणास फुटली गाणी ।

मूक संध्या समयी,
गहन धुक्याच्या वेळी,
रेखाटत बसली जोगीण,
ध्यानस्थ स्वरांच्या ओळी । 

आंदोलन स्वरगंगेच्या,
डोहात उतरले थोडे,
दिक्काला पैल निघाले,
चंद्रप्रभेचे रावे । 

कृष्ण बनातून फुलले,
त्या गीत फुलांचे झेले,
गंध दरवळे अवघे,
विश्व मोहुनी गेले ।

एकट कातर समयी,
त्या चंद्र भारल्या वेळी
 जोगीण उतरण तुडवी,
तो चंद्र माळुनी केशी। 

लेऊनि शुभ्र भगवेसे,
'अलख' जागते वारे,
अनिवारश्या ओढीने,
सूर चालती मागे … 


                  - अतिंद्र सरवडीकर
(गुरुवर्य डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित कविता)
२९ डिसेम्बर २०१३. पहाटे  ३