Wednesday 31 May 2017

दादरकर बाईंच्या संस्थेत गाणारा एक खड्या आवाजाचा मुलगा अशी त्याची मला ओळख होतीच, पण मैत्री 2013 मध्ये झाली. खरंतर आमच्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात Mayur एम.ए. करत असताना मी तिथे शिकवायला होतो. पण तरी सुद्धा आमच्यात झाली ती घट्ट मैत्री..!!! त्याला कारण मयूरचा मोकळा ढाकळा स्वच्छंद स्वभाव, माझ्या अगदीच विरूद्ध... मी मयूरमुळे भटकायला शिकलो, काहीही खरेदी करायची नसताना मॉलमध्ये फिरायला जाता येतं, तिथले सेल, ऑफर्स हेरून शर्ट पँट्स, सँडल, बूट यांची बेगमी करायची असते, एखाद्या दिवशी उगीचंच काम धंदा सोडून बिर्याणी हाणायचा बेत करायचा असतो, अजिबात ओळख नसलेल्या व्यक्तिशी गप्पा मारता येतात, स्थल काळ विसरून कुठेही दणकून गाता येतं, हे सगळं मी त्याच्या सोबत प्रथमच अनुभवलं (सगळंच इथं लिहितं नाही 😉)... आमच्यात कडाक्याची serious भांडणं होतात, माझ्या ईगोच्या विनाकारण पदोपदी चिंधड्या केल्या जातात, अगदी एकमेकांचं तोंंड पाहणार नाही असं म्हणून आम्ही निरोप घेतो...
 परवा त्याच्या लग्नातही मी त्याला एकदाही शुभेच्छा दिल्यात किंवा congratulations म्हटलं असं मला आठवत नाही. कसल्याही स्वरूपातली भेटवस्तू द्यायची नाही असं तर मी ठरवूनच गेलो होतो... लग्नाच्या आदल्या दिवशी 15 मे ला त्याचं संगीत होतं.. त्याचे अनेक मित्र त्यात उत्तम गायले.. माझ्या वाट्याला शेवटची भैरवी आली... खरंतर त्याच्या आदल्या दिवशी 14 ला माझा खूप तणावाचा, महत्वाचा, मोठा कार्यक्रम झाला होता आणि जागरणही... पहिले चार दोन स्वर लावले आणि भैरवीचा ओळखीचा सुगंध जाणवायला लागला... आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही हसलो...
मातीत, चांदण्यात, वार्यावर, पाण्यात अन् गाण्यात आपल्या माणसांचे असे  किती हुंकार मिसळलेले असतात कोण जाणे!  नुकत्याच कुणा लेखिकेेच्या ओळी वाचनात आल्या होत्या...
"आपण काय करू शकतो? तर आपल्या वाट्याला आलेला जीवनाचा, काळाचा, पृथ्वीचा एवढासा तुकडा सुंदर बनवू शकतो!"
आपल्या मैत्रीनं आपला हा एवढासा तुकडा विलक्षण सुंदर बनवलाय दोस्ता...

फक्त शुभेच्छा... 😊

- अतिंद्र सरवडीकर

PS - Missing you Rohan Dangat and Nikhil Nik