Wednesday 1 December 2021

 कृपा करी कृपा करी स्वामीराज माऊली,

तप्त झळा सोशितो द्यावी आता साऊली । 


आजवरी चाललो वाट एकला धीराने

दैन्य दु:ख भार सारा वाहिला मुक्याने

नाम मुखी ध्यान  मुर्ती  शमविते काहीली। 


आडवाट कंटकाची रात्र वादळी तमाची 

आसरा तुम्ही सुखाचा ज्याेत अंतरी तेवती

ध्यान मुर्ती पाहण्याची आस जीवा लागली ।


चेहर्यात शांतता डोळ्यात आर्तता

पाहती माझ्याकडे मज होई भास सारखा

मनीची अशांतता शांत शांत जाहली। 

                    - डॉ अतिंद्र सरवडीकर

आई

 पाडवा म्हणजे आईचा (वृंदा सरवडीकर) वाढदिवस... कणखर, खंबीर, प्रखर स्वाभिमानी पण संवेदनशील स्वभाव हे तिचं वैशिष्ट्य आणि तसंच कर्तृत्वही! म्हातारपणची काठी बनून आई-वडिलांचा मायेने सांभाळ केलेली कर्तबगार मुलगी, गृहकृत्यदक्ष गृहिणी, यशाचं शिखर गाठण्यासाठी मुलांना सतत प्रेरित करणारी आई, अनेक विद्यार्थ्यांना नुसतं संगीतच नाही तर जीवनाचे ही धडे देणारी आदर्श गुरू, असे अनेक पैलू तिच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत.  

तिने इंग्लिश विषयात पदवी मिळवली आहे. गणित विषयाची तिला मनस्वी आवड! छंद म्हणून ती गणितं सोडवायची... तिचं गणित इतकं चांगलं होतं, की संगीत शिक्षिका असतानाही ती नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजीच्या अनेक वर्ष शिकवण्या घ्यायची. मुलं सांगायची गाण्याच्या मॅडमकडे आम्ही गणित शिकायला जातो! 

 आई स्व. दत्तूसिंह गहेरवार सरांची संगीताची विद्यार्थिनी, सोलापुरात अगदी सुरुवातीला संगीत विशारद ही पदवी ज्यांना मिळाली त्या पहिल्या बॅचची १९६७ सालातली ! सवाई गंधर्व आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या इंदिराबाई खाडिलकर यांनी तिची संगीत विशारद ची परीक्षा घेतली होती. गात असताना खाली रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीचा हॉर्न वाजला तर इंदिराबाईंनी म्हणे थांबवून त्या हॉर्न चे सूर ओळखायला सांगितले होते, इतकी कठीण असे त्या काळी संगीत विशारदची परीक्षा! सिद्धेश्वर हायस्कूल प्रशालेने तर तिला सन्मानाने आमंत्रण देऊन खास बोलावून घेतलं होतं, कारण त्या काळात संगीत विशारद पदवी असणारे संगीत शिक्षक लाभणं हे अतिशय दुर्मिळ असायचं!  

१९७१ साली राष्ट्रीय पातळीवर पार पडलेल्या आणि अत्त्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कालिदास संगीत स्पर्धेत आईला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्या वेळी परीक्षक होते विख्यात संगीतकार सी रामचंद्र आणि पद्मभूषण विनायकराव पटवर्धन. विनायकराव हे तर गहेरवार सरांचेच गुरु त्यामुळे विनायकराव आणि गहेरवार सर या दोघांना ही हे यश अभिमानास्पदच होतं. आईचा थोडा खालच्या पट्टीतला पण ठोस आवाज आणि गमकेची वजनदार तान याचं विनायक बुवांनी खूप कौतुक केलं होतं! विख्यात चित्रपट कवी शांताराम नांदगावकर यांनी आईला मुंबईत येऊन रहायचा आणि गायिका म्हणूनच करीअर घडवायचा आवर्जून सल्ला दिला होता, पण त्या काळाच्या एकूण पार्श्वभूमीवर तसं होऊ शकलं नाही. 

पुढे संसाराच्या रहाटगाडग्यात गायिका होण्याचं मागे पडलं पण स्वान्त सुखाय संगीत साधना मात्र अगदी नियमित सुरूच राहीली. तिचं उत्तम आणि चौफेर वाचन ही वाखाणण्याजोगं! फक्त मुलांच्या शाळेतला ६०-७० विद्यार्थ्यांचा तिचा अख्खा वर्ग हाताने ताल देऊन भूप, यमन, दुर्गा सारख्या रागांच्या बंदिशी गायचा. आज शाळांमध्ये सिनेमाची शालेय मुलांच्या वयाला न शोभणारी गाणी शिकवणारे संगीत शिक्षक पाहिले की मला आईचं हे कार्य आवर्जून जाणवतं. एकदा एका इंग्लिश गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी म्हणे आई समोर संगीताला कमी लेखलं आणि त्यांचाच विषय शिकवण कसं अवघड आहे याचं वर्णन केलं, आईने तात्काळ करारी पणे उत्तर दिलं मी तुमचा विषय शिकवते तुम्ही माझा विषय शिकून दाखवा. एका बेसूर विद्यार्थ्याला जरी तुम्ही सुरात आणू शकलात तरी तुमचे शब्द मी मान्य करेन ! 

देवा समोर हात जोडले की "आम्हाला खूप कष्ट करायची शक्ती दे आणि आमच्या कष्टांना यश दे" एवढंच मागायचं असतं असं आईने आम्हाला शिकवलंय. या प्रार्थनेचा अर्थ खोलवर आम्हा मुलांमध्ये रूजलाय... 

आईच्या वडीलांना नानांना अंधत्व आलं होतं. अनेक वर्ष ते त्या अवस्थेत होते. आईने अतिशय कष्टाने आणि मायेने त्यांचा कायमचा सांभाळ केला. पप्पांनी जावई असून कसल्याही अपेक्षे शिवाय मुलासारखी त्यांची सेवा केली. नानांना तीन वेळा मध्यरात्रीतून हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतरची सगळी धावपळ आठवली की आजही अंगावर शहारा उभा राहतो. आईने अत्यंत धीराने सगळ्याला तोंड दिलं, त्यांना बरं केलं. शेवटी नानांनी आई पपांना आणि आम्हा मुलांना तोंडभरून दिलेला आशिर्वाद आज सर्वार्थाने फळाला आलाय. 

 मे महिन्यात पप्पा आम्हाला सोडून गेले. मोठा कठीण काळ आम्ही पाहीला. पप्पा ३८ दिवस आयसीयू मध्ये होते. याच काळात मला आणि प्रियालाही कोरोना झाला. मला तर १० दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट व्हावं लागलं होतं. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने दादा वहिनी येऊ शकत नव्हते. ताळेबंदीमुळे इतर कुणी मदतीलाही येऊ शकत नव्हतं. आईच्या कणखर स्वभावाचा आणि धीरोदात्तपणाचा सगळ्यांना परत एकदा अनुभव आला. 

पप्पा गेल्यानंतरच्या मधल्या काळात आई माझ्याकडे मुंबईला घेऊन राहिली. थोडी शांत वाटत होती. सगळं पूर्वपदावर यायला लागलं तसं म्हणाली मी आता सोलापूरला जाते, माझे विद्यार्थी वाट बघत असतील. म्हातारी झाले असले तरी अजून माझं करिअर संपलेलं नाही. मी अनेक रागांमध्ये नव्या बंदिशी बांधलेल्या आहेत त्या मधल्या अनेक तिने तिच्या अत्यंत सुंदर वळणदार अक्षरात लिहून घेतल्या. म्हणाली आता तुझ्या या नव्या बंदिशी शिकवते मुलांना, तेव्हढाच बदल होईल. 

दिवाळीच्या सुट्टीत आम्ही सोलापूरला आलो. आईची नुकतीच एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथून संगीतात एम ए झालेली विद्यार्थिनी मृदुला म्हसकर पास झाल्याचे पेढे देऊन गेली होती. समूह सुरात बाकीचे विद्यार्थी वृंदावनी सारंग रागातील माझीच बंदिश गात होते... 

जगत जननी देवी लछुमी

सकल जीव शरन तिहारी ।

 देहो दान कृपा संपद

तेज बल धीरज मांगत

दूध पूत अन धान ।।

Saturday 19 June 2021

संगीतातले स्त्री पुरुष

 संगीतात लिंगभेद असतो का ? त्या आधारावर संगीताच्या स्वरुपात, प्रकटीकरणात सांगितीक द्रष्ट्या काय भेद घडतो? यांतली सिमारेषा कितपत ठळक असते ? आजच्या महिला दिनानिमित्त हा जरा वेगळा विचार. 

--------------------------------------------------------------------------

आजच्या अभिजात संगीताला व्यापून राहिलेला "ख्याल" हा गानप्रकार सुरवातीला 'जनानी', म्हणजे स्त्रियांसाठी बनवलेला गानप्रकार म्हणून ओळखला जायचा म्हणे. "सदारंग" हा ख्यालाचा आद्य रचनाकार महम्मदशहा राजाच्या दरबारात होता. राजाची मनधरणी करायला त्याने ख्यालाच्या रचना करायला सुरूवात केली. या रचनांचा विषय स्त्री केंद्री असायचा. स्त्रिया महम्मदशहा राजाला प्रियतम मानून त्याची मनधरणी करतायत, त्याला रिझवतायत, त्याच्या विरहाने व्याकुळ होतायत अशा अर्थाच्या या रचना होत्या. हा ख्याल रुजला, लोकप्रिय झाला. या विषयाने ख्याल गानप्रकाराचा इतका ताबा घेतला, की सदारंगाला जाऊन शतकं उलटली तरी आजही ख्यालाच्या ' नायिकेची भूमिका मांडणार्या' रचनाच गायल्या जातात, रचल्या जातात. 

अल्लादियाँ खाँ, फैय्याज खाँ, वहिद खाँ, बडे गुलाम अली खाँ यां सारखे भरदार दाढी मिश्या राखणारे, व्यायाम करून एखाद्या पहेलवानासारखं शरीर कमवलेले गायक सुद्धा अशा नायिकेच्या भुमिकेतल्या बंदिशीच गात असत. भले त्या मागे मधुरा भक्तीचा भाव असेल, पण विषय नायिकाप्रधान होता हे मान्य करावं लागेल... 

ठुमरी हे तर मुर्तिमंत लालित्य ! तिथंही परत स्त्रित्वाचाच आविष्कार. ठुमरीचे बहुतेक रचनाकार पुरूष असूनही नायकाच्या तोंडी शोभेल असा विषय तिथे नाहीच. पुरूषही विरहाने व्याकूळ होतातच की, पण त्याची फारशी दखल कुणाकडुन घेतली गेल्याचं दिसत नाही. 

नाट्यसंगीताच्या प्रांतात बालगंधर्वांसारख्या अद्वितिय गायक नटाने कायम स्त्रीभूमिका केल्या. सवाई गंधर्व, दिनानाथ, मास्टर कृष्णराव, छोटा गंधर्व हे सगळे स्त्री भूमिका उत्तम निभवत...

सुगम संगीतात तर मला आश्चर्याचे अनेक धक्के वारंवार बसतात! सुगम संगीतातल्या अनेक संगीतकारांवर स्त्री अावाजाचा, तिच्या अभिव्यक्तीचा जबरदस्त असर पडलाय असं मला फार जाणवत आलय ! तुज मागतो मी आता, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, भय इथले संपत नाही ही सगळी पुरूष भुमिकेला साजेशी गाणी ना ? मग ती स्त्रीच्या आवाजात कशाला ? अगदी सुहाग रात है घुंघट उठा रहा हु मै, या असल्या ओळी सुद्धा स्त्री आवाजातच लोकांना ऐकवायची सवय आपल्या संगीतकारांनी लावलीये. मला आठवतं, कॉलेजात असताना एकदा संगीतकार सी.रामचंद्र यांच्या गाण्यांची एकदा स्पर्धा होती. तेव्हा असं लक्षात आलं होतं की त्यांच्या शेकडो गाण्यांमधे अगदी तुरळक पुरुष गीतं आहेत. असं अनेक संगीतकारांबाबतीत आहे ! 

इतर अनेक युगल गीतात पुरूष गायकांना येणार्या ओळी तुलनेने साध्या असतात. याचं शुक्रतारा सारखं उदाहरण आहेच (बाईला 2 कडवी आणि पुरूषाला एकचं, असं का ब्वा !!!!) 

 टिव्हीवरुन ओसंडून घरांत शिरू पाहणार्या अगणित सिरीयल्स पैकी किती थोड्यांची शिर्षकगीतं पुरूष आवाजात असतात?

स्त्रीचं असहाय होणं, दुर्बल असणं, प्रेमात पडणं, अल्लड असणं खूप वेळा संगीतबद्ध झालंय, पण पुरूषांचं गंभीर असणं, आतुन हळुवार असणं, तुटून प्रेम करणं, रांगडं असणं, जीव तोडुन जवाबदारी उचलणं, मवाळ असणं, लाजाळु असणं, वीर असणं किंवा रागिट असणं ही केवढी जास्त एक्सप्रेशन्स आहेत! ती कधी आणि कशी समोर येणार ? 

 जीवलगा, या चिमण्यांनो, जाहल्या काही चुका, भेटी लागी जीवा किंवा हिंदीतल्या लग जा गले सारख्या गाण्यांचा स्तर गाठू शकतील अशी पुरूषांची गाणी खरचं खूप कमी सापडतील. 

अलीकडे तर पुरूषांची गीतं म्हणजे केवल उंच उंच स्वर लावायचे एवढं एकच एक्सप्रेशन उरत चाललय मग तो सूर 'निरागस' असो वा 'दमलेला'.. 

आपल्याकडे हे दालन थोडं अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक Sensitivityने धुंडाळलं गेलं पाहिजे असं वाटतं.


                                                    - डॉ. अतिंद्र सरवडीकर 


--------------------------------------------

Saturday 9 January 2021

 व्यक्ती  कलाकार म्हणून वावरत असताना केवढे निरनिराळे अनुभव येत असतात! योग्य मेहनतीनंतरची पहिली पायरी असते स्वतःच स्वतःला कलाकार म्हणून स्विकारण्याची. आत्मविश्वास उत्पन्न होण्याची! त्यात बाधा ठरणारे लोक आणि घटना विस्मृतीत ढकलण्याची... पण खऱ्या अर्थाने यशस्वीतेची चाहूल तेव्हाच लागते, जेव्हा लोकप्रियतेमागून लोकअप्रियतेचे पडसादही उमटू लागतात... अनेक लोक आपल्या संघर्षावर लक्ष ठेवून असतातच, पण उल्लेख करण्याची, संधी देण्याची वेळ आली की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सकारात्मक टिके मागोमाग, जाणिवपूर्वक, विशिष्ट हेतूने केलेली टिका, प्रसंगी टिंगलटवाळ्या, सततची तुलना, गॉसिप वगैरे होऊ लागतं. हेतूंवर, प्रामाणिकपणावर, मेहनतीवर शंका उपस्थित केल्या जातात. 

 प्रेम करणारे, काळजी वाहणारे प्रियजन, चाहतेही अपेक्षांची ओझी लादून जीव हैराण करतात, तर टोकाचा मत्सर, द्वेष करणारे सुमार लोक दुसरेच मुखवटे घालून अस्वस्थ  व्हावं इतकं आयुष्यात लक्ष घालू पाहतात ! अनेकदा शिष्य, चाहते, मित्र बनून गोळा झालेले स्वत:चा फायदा काढून झाला की क्षुद्र मानसिकतेचं प्रदर्शन करतात. खोलवर दुखवतात! गुंतलेली आतडी तिथून कापून काढून त्याला नव्या गाठी मारणं तेवढं साेपं नसतंच! 

 हे सगळं काही काळ अनुभवलं की मग इतरांनी स्तुती सुमनं उधळणं आणि पायदळी तुडवणं एक सारखंच वाटू लागतं... हळूहळू गुंतलेला जीव इतका सुटतो की, चांगली वा वाईट कोणतीच माणसं नकोत आयुष्यात, निखळ एकांत हवा, असं वाटू लागतं. सरतेशेवटी एकूणच आयुष्यातले  फायदे-तोटे दूरस्थ होत जातात आणि केवळ कलाकृतीशी नातं शिल्लक उरतं !!! लोकांना हा कलावंताचा माज वाटू शकतो, प्रत्यक्षात ते घनदाट एकाकीपण असतं... जिथं स्वत:च्या आवाजाशिवाय काही ऐकू येईनासं होतं, दूरवर जात क्षितिजात हरवणाऱ्या आपल्या पाऊलवाटे शिवाय काहीच दिसेनासं होतं, आसपासचं  अस्तित्व जणू गोठलेलं असतं... तिथून काही घटका परतलं, इतरांच्यात मिसळलं तरी ते  तात्पुरतं असतं... 


गगन महल में सेज बिछी है

अनहद बाजे बाज रहे री ! 

बाहेर ढुंढन जा मत सजनी 

पिया घर बीच बिराज रहे री! 

 - डॉ अतिंद्र सरवडीकर 


#My_interpretations #foodforthought