Saturday 13 May 2023

ऋण

 दीप लागो अंतरात, मार्ग दिसो त्या प्रकाशात,

जाणिवांचे घुमो आर्त, कृतींमधले गळो स्वार्थ,

जीवनाचा कळो अर्थ, चालणे त्या ठरो सार्थ,

ध्यास राहो तन मनात, ध्येय मोठे अंबरात,

मीपणाची सुटो गाठ, दिव्यत्वाची मिळो वाट,

शाश्वताची पटो खूण, अस्तित्वाचे फिटो ऋण.

- डॉ अतिंद्र सरवडीकर 

"करवत"

एक मित्र ठरू शकतो भारी

हजार शत्रूंवर कधीही! 


त्याला आत बाहेर असतं माहीत सगळं आपल्या बद्दल

माय, बाप, बायको अन नातलगांहून ही जास्त काही ! 


कधी कधी थट्टेतच तो अणकुचीदार शब्दांची अन् कृतीची करवत फिरवत राहतो. उमाळ्यानं भरलेल्या आतड्यावर... 

फिरवत राहतो.


दुष्मनावर प्रतिहल्ला करता येत असतो 

दोस्ताकडे मात्र केवळ बघता येतं, 

कारुण्य भरल्या नजरेनं... 


 - डॉ अतिंद्र सरवडीकर 

Wednesday 3 May 2023

झाडं 🌿

 निष्पाप माणसं उभी राहतात चुपचाप... 

मारलं जरी कुणी कोपर आणि काढला जरी चिमटा, विनाकारणच! 

शब्दाच्या, कृतींच्या सुऱ्या भोसकत राहतात त्यांना... 
परके अन आपले सगळेच करतात रक्तबंबाळ,
सहजच! 

निष्पाप माणसं हसत राहतात मंद... 
डोळ्यातलं पाणी दडवत आणि ओठातला शब्द चावत, 
भेदरलेला! 

त्यांच्या चांगुलपणाची दखल घेतं कोण ? 
नसतं करत कुणी कौतुक किंवा सत्कार,
प्रांजळपणाचां! 

स्वतःला कमी लेखत संकोचूनच निघून जातात ती एक दिवस... 
रानातला एक एक वृक्ष म्हणे सुकून जातो तेव्हा, अचानकच! 

जंगलं संपतायत ते उगाच नाही! 
त्यानंतर उरेल फक्त वाळवंट...

झाडं जपायला हवीत ना ! 

- डॉ. अतिंद्र सरवडीकर 

सृजन

 ध्यान जळातून उठूनी बसली क्षणभर तिची वीणा ही थांबली,

आदिमाया सुरेश्वरीची जपमाळा ही जरा विसावली । 


उदंड जाहले गायक बघुनी हसली देवी माता,

हंसवाहिनी वीणाधरिणी पाही डोकावुनिया ।


जो तो इथे महान झाला, अर्ध्या हळकुंडाने न्हाला,

स्पर्धेेमधल्या हलकल्लोळाने, राग - श्रुतींचा सूर्य बुडाला ।


गाणं म्हणजे खेळ शो-बाजीचा, नाद गोंगाटात बदलला,

झुंजी मधल्या कोंबड्यागत गायकाला गायक भिडला ।


सूर म्हणजे तर गंध फुलाला, जसा सहारा दिप ज्योतीला,

दैन्य गांजते खऱ्या साधका; ओळखण्या त्या रसिक विसरला !


तू मोठा की मी मोठा ? हाच प्रश्न केवळ उरला आता!

ज्याच्यापाशी प्रसिद्धी पैसा तोच ठरला आणखी मोठा ।


दीप निमाले तिमिर पसरला...अंधारी त्या मार्ग हरवला...

ध्यान साधना युगा युगांची, सूर सरींचा ओघच अटला... 


हताश झाली ब्रह्मकुमारी, श्वेत वसनी विद्यादायिनी,

जाऊन बसली निज एकांती,ध्यान मग्न जपमाळा धरुनी। 


करीची वीणा दूर ठेवली, करुणा भाके प्रजापतीची,

गोंगाटाचा अस्तं होऊनी, ओंकाराच्या नव सृजनाची । 

- डॉ अतिंद्र सरवडीकर