Friday 24 January 2014

स्वरभास्कर


भीमसेनजी जर तुम्ही आज असता 

स्वरभास्कर की महागायक काय बरं झाला असता ?


म्हणे गाण्यासाठी गाव तुम्ही सोडलात 
रेल्वेत रस्त्यात भीक मागत,
देशभरात गुरु शोधलात 
असत भावलं का तेवढच संगीत 
जर तुम्ही आज असता ? 
स्वरभास्कर की महागायक काय बरं झाला असता ?


आता भिक मागायला राग ठुमऱ्या चालणार नाहीत 
शिला मुन्नी शिवाय आमचे लोक काही ऐकत नाहीत 
टी.सी. ने वगैरे तर गाणं ऐकायचा प्रश्नच नाही !
असता पोहोचला सतगुरू पर्यंत ?
जर तुम्ही आज असता ? 
स्वरभास्कर की महागायक काय बरं झाला असता ?


भेटते का सवाई गंधर्व अश्या कमर्शियल जगात ?
फी देऊन तरी मिळाल असतं खर ज्ञान ?
भरले असते रियाजाचे खरच इतके तास ?
पाणी भरायला मात्र मिळाल असत खास !
जर तुम्ही आज असता.. 
स्वरभास्कर की महागायक काय बरं झाला असता ?


आता कार्यक्रमात लागतात फक्त ताऱ्यांचे आवाज 
गाण्यापेक्षां दिसण्या नाचण्याचा बवाल 
गेलात जरी स्पर्धेत versatility चा आहे सवाल !
कुणी सांगाव परीक्षकांनीच दिला असता तुम्हाला नकार !
जर तुम्ही आज असता ! 
स्वरभास्कर की महागायक काय बरं झाला असता ?


म्हणून म्हणतो भीमसेनजी पुन्हा एकदा या 
ढेपाळल्या,मरगळल्या मांडवात घुमू दे मल्हार 
शोभेची कारंजी पाहणार्यांना बघू दे जलप्रपात;
अंतरीच्या सुरांनी भरला असता गाभारा 
जर तुम्ही आज असता …. 

स्वरभास्कर नि महागायक दुसरा कुणीच दिसला नसता 

स्वर भास्कर, महागायक व्हायला दुसरा कुणी धजला नसता ।

                                         - अतिंद्र सरवडीकर 


* ( सदर कविता भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या तृतीय स्मृती दिनाच्या (२४-०१-२०१४) औचित्याने प्रसिद्ध केली आहे. भीमसेनजींचा काळ आणि आजचा काळ या बद्दल सहज सुचलेली ही कविता आहे. कुठलीहि संगीतस्पर्धा, कार्यक्रम, व्यक्ती अथवा कुणाही कलाकारावर टीका करण्याचा कोणताहि उद्देश येथे नाही )

1 comment: