Thursday 13 July 2023

 


"व्रतस्थ संगीत साधनेची तप्तमुद्रा" 
                            - प्रथमेश अवसरे 

येत्या १५ जुलै रोजी कै सिद्धा पाटील स्मृती समिति तर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल युवा पिढीतील प्रतिभावान गायक  डॉ अतिंद्र सरवडीकर यांना  बालगंधर्व सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक काळ सर्वच क्षेत्रात सर्वस्व पणाला लावून काम करणारी आदर्श व्यक्तिमत्वं  विपुल प्रमाणात होती. आजच्या पिढीला अशी माणसं माहीत आहेत का ? व्यासंगाची, कष्टांची, स्वतःच्या कामात झोकून देण्याची तयारी यांच्या ओळखीची आहे का ? धंदेवाईक विद्वत्तेच्या आणि संपर्क माध्यमांच्या वेढ्यात अडकलेल्या कोवळ्या मनांची सतत दिशाभूल होत असताना, ध्येयवाद कसा जपला जातो याची यांना कल्पना आहे का ? भोवतीच्या अफाट गतिशील काळानं आणि भोवतालच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीने ज्यांच्या शारीर-मानस सामर्थ्यावर प्रचंड दबाव आला आहे अशा नव्या पिढीचे अनेक प्रतिनिधी आपल्या आसपास वावरत असताना असे प्रश्न आपल्या मनात सहज उमटू शकतात. पण अपवाद असतात आणि तेच त्यांच्या क्षेत्राचा स्तर उंचावत असतात. 

डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा जन्म सोलापूर येथे झाला. बहुतेक कला क्षेत्रातल्या व्यक्तींचा होतो तसा संगीत शिक्षणाचा त्यांचा मुळारंभ घरातूनच झाला. आई वृंदा सरवडीकर सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत संगीत शिक्षिका. त्यांच्या कडून स्वर ओळख झाली. पुढे स्व दत्तूसिंग गहेरवार यांचं मार्गदर्शन लाभलं. गाण्यातल्या विशारद वगैरे परीक्षा झाल्या. जोडीला तबला ही शिकणं सुरु होतं आणि त्यातही विशारद पदवी मिळवली. हे सगळं घडत होतं त्यांच्या वयाच्या केवळ १५/१६ व्या वर्षी. त्या न कळत्या वयात शाळेचा अभ्यास, मित्रांबरोबर खेळणं बागडणं तसंच संगीतही सहज वाटायचं. ते करणं म्हणजे काही वेगळं करतोय असं वाटायचंच नाही. १० वी ला बरे मार्क मिळाले आणि अतिंद्र मित्रांबरोबर ११ सायन्सला आपसूक दाखल झाला. पण दिवस जात राहिले तसे मनोवस्थेत बदल घडू लागले. याच सुमाराला निर्माण झाली ती गाणं ऐकण्याची पराकोटीची आवड! शास्त्रोक्त संगीतातल्या दिग्गजांचा कलाविष्कार रात्रंदिवस ऐकण्याचा अक्षरशः सपाटा सुरु झाला. आणि मग आपण गाण्याशिवाय राहू शकत नाही, हेच आपलं कार्यक्षेत्र आहे हा साक्षात्कार ही  झाला.             
 
चांगल गायक व्हायचं तर आधी उत्तम गुरु हवा, पक्की शिस्तबद्ध तालीम हवी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाण्याच्या परीक्षा वगैरे पलीकडे जाऊन घरंदाज गायकीचं  भांडवल हवं याची जाणीव झाली. विविध कलाकारांचं गाणं ऐकत असताना डॉ प्रभा अत्रे यांच्या गाण्याकडे अतिंद्रचं मन विशेष आकर्षित झालं होत. त्यांच्या गाण्यातली नवनिर्मिती, त्यातलं बुद्धी आणि भावनेला असणारं आवाहन, सादरीकरणातली एकूणच परिपूर्णता हे सगळं अनुभवून, आपण  शिकायचं तर यांच्याकडेच असा  मनाचा निर्धार झाला होता. गुरु नुसता प्रसिद्ध कलाकार असून चालत नाही त्याच्या व्यक्तिमत्वात गुरुतत्व हवं. शिष्य घडवण्याची इच्छा आणि क्षमता त्याच्या ठायी असली पाहिजे. प्रभाताई या सर्वच बाबतीत परिपूर्ण होत्या. पण प्रभाताई मुंबईत आणि अतिंद्र सोलापुरात. मग सुरु झाला शिक्षणासाठी सोलापूर - मुंबई असा प्रवास. आणि पुढे सोलापूर, इथलं घरचं सुरक्षित वातावरण सोडून लहान वयातच मुंबई सारख्या महानगरीत स्थलांतरित होणं. 

प्रभाताईंसारख्या स्वयंभू प्रतिभेच्या कलाकारांकडे शिकणं काही सोपं नसतं. त्यासाठी हर तर्हेच्या कसोटीला सिद्ध व्हावं लागतं. अतिंद्रने ते काम निष्ठेनं केलं आणि गुरुप्रसाद संपादन केला. गुरूंनी उत्तम प्रकारे ज्ञान दिलं आणि अतिंद्रने मन लावून कठोर परिश्रम केले. अखंड रियाझ केला. अत्यंत प्रभावी प्रत्यक्ष गायन क्रियेबरोबरच गुरुवर्य प्रभाताईंचे रचनाशीलता, लेखन, संशोधन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातले पैलूही आत्मसात केले. पुढील काळात त्यातही ख्याती प्राप्त केली. मुंबई विद्यापीठानं प्रदान केलेली सगळ्यात पहिली संगीत विषयातली डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्याचा बहुमान ही डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना प्राप्त आहे. 

त्यांनी आपल्या शालेय व कॉलेज जीवनात विविध संगीत स्पर्धांमध्ये मिळालेले २८ राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार,भारत सरकारची विशेष गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती, पं भीमसेन जोशी शिष्यवृत्ती,मुंबई आकाशवाणीची उच्च श्रेणीची अर्हता हे आणि असे अनेक बहुमान प्राप्त केले आहेत.  

आपल्या आता पर्य॔तच्या यशस्वी कार्यकिर्दीत शास्त्रीय संगीताबरोबरच, ठुमरी, दादरा, गीत, गझल, भक्तिसंगीत, फ्युजन अश्या अनेक प्रांतात मुक्त संचार केला आहे . देश विदेशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय दिलेला आहे. यामध्ये सवाई गंधर्व समारोह कुंदगोळ, इंडिया फेस्टिवल लंडन, सप्तक समारोह अहमदाबाद, राष्ट्रीय संगीत परिषद कलकत्ता, ओरिसा राज्य संगीत महोत्सव, पूरब अंग ठुमरी महोत्सव बनारस, एनसीपीए मुंबई, पुलोत्सव पुणे यांसारख्या जगविख्यात समारोहांचा समावेश आहे. सुगम संगीताबरोबरच रागदारी संगीताच्या त्यांच्या जवळपास तीनशे बंदिशी त्यांनी रचल्या असून त्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या बंदिशींमध्ये काही अत्यंत अभिनव प्रयोग असून त्यांचं संगीत चिंतन त्यात पुरेपूर उतरलेलं आहे. 

मराठी - हिंदी बरोबरच तामिळ भाषेत गायलेली त्यांची गाणी विविध माध्यमांतून आज सर्वत्र उपलब्ध आहेत आणि आजच्या युवा पिढीत विशेष लोकप्रिय ठरली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उस्ताद अल्लाउद्दीन खाँ पुरस्कार, कलासाधना पुरस्कार, पद्मश्री कविवर्य द रा बेंद्रे पुरस्कार, कलारत्न, प्रमिलाबाई देशपांडे पुरस्कार, नुकताच मिळालेला सोलापूर रत्न पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.

 डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी लिहिलेली "किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह" तसेच "मध्यान्हीच्या मैफली" ही दोन संगीत विषयक पुस्तके प्रकाशित असून संगीत क्षेत्रात या पुस्तकांना अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. 

डॉ. अतिंद्र सरवडीकरांचं स्वतःच्या पद्धतीनं स्वतःच्या कामात असणं, अतिशय नम्र व साधं असणं, इतर कुणाची नक्कल न करता स्वतःला स्फुरलेलं संगीत सादर करणं, स्वतःच्या शैलीत स्वतःचं आयुष्य खास बनवून घेऊन जगणं, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आजच्या काळात संवेदनशील व विचारी माणसांचं आपल्याला लाभलेलं अस्तित्व मला अनेक कारणांनी विलक्षण महत्त्वाचं वाटतं. अशा माणसांची कदर होणं हेही तितकंच महत्वाचं असतं. कै सिद्धा पाटील स्मृती समिति तर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान  दिलेल्या कलाकारांचा राज्यस्तरीय बालगंधर्व सन्मान देऊन यथोचित गौरव केला जात असतो. यावर्षी डॉ अतिंद्र सरवडीकर यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १५ जुलै रोजी सायं ५:०० वा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना  सन्मानित करण्यात येणार आहे. युवा पिढीतल्या व्रतस्थ संगीत साधकाची योग्य प्रकारे दाखल घेतली जाणार आहे.  डॉ. अतिंद्र सरवडीकरांच्या साधनेची तप्त मुद्रा संगीत क्षितिजावर आता उमटू लागली आहे. निस्सीम संगीत प्रेमींसाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे. 


No comments:

Post a Comment