Friday 22 May 2020

बंद दारे ...



भागलेल्या जीवा, नाही क्षणाचा विसावा, 
तापलेल्या डोई, वाहे भार संसाराचा, 

जन्म दिलास देवा, आता मरायचे कसे ? 
विषारी हवेतही घर आठवे... बोलवे...

वाट दूर दूर जाई, जसा सर्प पहुडेला,
दोन पाऊले सानुली, त्यात नुपूर दबलेला,

झपझप चालू, मैल हजार राहिले! 
कुणा हाती बाळ, कुठे थकले जोडपे, 

तहानलेला जीव बाप्पा, पोटी नाही दाणा! 
चोची वासून चालले...  थवे...  दिगंताला... 

भर मध्यान्हीच्या वेळी, गाव ओसाड झोपले!  
काळ रात्रींच्या मिठीत, जणू चैतन्य लोपले,  

अडलेल्या लेकीला या, घ्या गं आडोशाला! 
धीर धर बाई जन्म निखारा पेटलेला, 

हायवे कडेला तिचा तान्हुला जन्मला!
आता विचारावे कुणा? हा कोण्या राज्यातला?

किती सोसावे कळेना, किती जोडले जुळेना, 
गर्व धर्म जाती रिती मात्र जळता जळेनात 

कुठे येणे कुठे जाणे? चुकवावे कसे देणे? 
देह वेशीपाशी आला आणि बंद झाली दारे... 

                             - डॉ अतिंद्र सरवडीकर






No comments:

Post a Comment