Wednesday 19 April 2017

राधार्पण


ऐन दुपारी कदंबाखाली, कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी 
रंग उधळूनी रास रचुनी, गोफ गुंफती हरी भोवती 

इतक्यात सर्रकन अवचित रुतला, कमल चरणी हरीच्या काटा !!
राधा राधा सत्वर वदला, घननीळ नेत्री अश्रू दिसला !

सुंदर भामा ,कोमल रखमा, जांबुवंती अन वदली कमला 
बसता उठता राधा राधा! नसे जागा का आमुच्या प्रेमा ? 

सोळा शृंगार तुझ्याचसाठी, घास मुखी तव आमुच्या आधी,
दारी लाविला पारिजात हा, सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी !

चिडली भामा, रुसली रखमा बरे न हे 'राधेला' विसरा 
कोण गोपी ती ? कुठल्या घरची ? आम्हा सामोरी का तिची  मुजोरी  ?

नकोस फसवू , शपथ तुज सखया, कलंक न हा भाळी लागो तुझिया,
उठले हरी ... दूर जाहले ... टक लावूनी..  अभ्र पाहिले ... 

शांत घटका सरली अन् मग, मंजुळ वाणी बोलू लागले 
वृंदावन जेव्हा टाकिलें, अन् सोडिले राधेला, पुन्हा न होणे भेट, माहित झाले भाबडीला 

माग म्हणालो आज काहीही, माझी आठवण... खूण प्रीतीची...
बोलली राधिका झुकवून डोळे, कधी न मागिले आज मागते..

सल जरी इवला, रुतला तुजला डंख तयाचा व्हावा मजला ! 
कमलदल पावलांना तुझिया पायघड्या ह्रदयीच्या व्हाव्या 

चाललास जरी दोन पावले, क्षेम कुशल तव मज धाडाव्या 
म्हणून सखये ओठी राधा दोन तन मने एकच गाभा  

पाऊल जरी मी एक ठेवले ती भू नाही ग काळीज स्मरते !!
म्हणून सांगतो प्रिय सखी तू राधा मात्र माझे मी पण... 

राधे इतकी प्रीती मजवर आहे कुणी का केली सांगा ? 
म्हणून सांगतो निजभक्तांना कृष्णा आधी बोला राधा... 

प्रितीचे ते सुंदर मंदिर कशी करावी दूर आठवण ? 
राधा भरली कणा कणातून कृष्ण राहिला फक्त राधार्पण... 

- डॉ. अतिंद्र सरवडीकर ©

4 comments:

  1. ही बरेच जण स्वत:चे नाव वापरून शेअर करत आहे. ही तुम्ही लिहिलेली कविता आहे ना?

    ReplyDelete
    Replies
    1. This is my original poem... Plese inform people if they are sharing it without my name

      Delete