Sunday 3 April 2016

देवदासी

ढगाच्या खाली पण जमिनीच्या वर
तरंगत राहिलयं अस्तित्व माझं...


नरकाहून दूर, स्वर्गाच्याच वाटेवर,
रस्ताभर पडलाय सडा वासनांचा...


आसक्तीच्या लाटा अन इर्षेचा वारा,
झोंबतोय अंगाला थंडगार... 


अर्धवट सुटलेले अन खुणावणारे हात,
खेचू पाहतायत मला त्यांच्याकडे...


जो तो दरडावतोय मला, डोळे वटारून,
म्हणतोय 'मला देव मान' अन सोपव तुझं शरीर...


संताप आणि चीड, निराशा आणि वेदना,
ठसठसत राहिलीये तन मनात... 


अंधारल्या वाटेवर दिशाहीन ठेचकाळताना,
मला दूरवर दिसतोय समुद्र मृगजळाचा...


त्या समुद्राकाठचं सुरेख देऊळ, 
अन ‘वाट पहा’ असं सांगणारा तिथला देव, 


त्या तिथे दूरवर कुणीतरी आहे, या जाणिवेनेच फक्त... 
विसर पडलाय वाटेचा, अन वेदनेला फुटतोय कोंब, ओंकाराचा !
                                                                                                                  - अतिंद्र सरवडीकर

  

No comments:

Post a Comment