Tuesday 12 February 2013

भिन्नषडज

भिन्न वाटा जाहल्या रे
याद थोड्या राहिल्या
पान वेलीला सुनावे
भिन्न आता सावल्या ।

वळण वाटी भेटलेल्या
जीवलाव्या त्या खुणा
भिन्न गावे गाठताना
हाक घुमवीत राहिल्या ।

पायवाटा वेगळाल्या
हात हाती वेगळाच
गीत पुसण्या का कधीचे
भिन्न षड्जी लागल्या ?

वेचलेल्या स्मृतींच्या
गोठलेल्या पाकळ्या
बहरण्या प्राजक्त दारी
ओघाळोनी टाकल्या ।

भिन्न वाटा जाहल्या रे
याद थोड्या राहिल्या
पान वेलीला सुनावे
भिन्न आता सावल्या ।

--- अतिंद्र सरवडीकर

No comments:

Post a Comment