Tuesday 12 February 2013

ज्ञानोबा

सहन सिद्धीचा हो योगी दु:ख कालिंदीच्या तीरी
शांत रसाला भरती गाढ लागली समाधी |

नवतरुण तेजाळ त्याला विश्व गवसले
महाशून्यात बैसला त्या पैस नाव दिले |

सा-या जगाचे गुपित बालपणीच जाणले
चालविली जड भिंत रेड्या वेद वदवले |

ज्ञानमित्र दीपाळता म्हणे विश्व हेचि घर
ओवी ओवीत गुंफले विश्व आर्त प्रकाशले |

कालातीत दिव्य तेज प्रकटून दु:ख भोगी
शांत अद्भुताची लेणी अश्रू अश्रूत खोदली |

किती साहिले बा त्याने सारे पारिजात केले
सडा ज्ञानाचा शिंपला सारे भरून पावले |

त्याने लावलेले तेच एक कैवल्याचे झाड
चैतन्याच्या गाभा-यात आजही पुंजाळत |

त्याच्या शब्दांची नक्षत्रे त्याच्या वेदनेचे दीप
त्याचा आठव दाटता विरे मोहाची जाणीव |

- डॉ अतिंद्र सरवडीकर

No comments:

Post a Comment