Saturday 4 May 2019

धारावी

होतात म्हणेे लग्नं रस्त्यां लगतच्या झोपड्यांमध्येही! 
आणि नांदतात  कुटुंबंच्या कुटुंबं  हसत खिदळत! 

रांगतात मुलं रेल्वे ट्रैक लगतच्या घरांमधलीही! 
रेल्वेखाली न येता! आणि डास चावूनही मलेरिया न होता! 

वार्यावर उडून जातं छप्पर अन घरात येतो पाऊस रहायला  
कधी जळतात घरं; आणि मग येतो कुणी पत्रकार कैसा लगा? विचारायला.... 

माहेरवाशिण म्हणे इथे आनंदाने येते... 
फाटक्या चिंध्यांचं गाठोडं हुंडा म्हणून नेते.... 

काठी टेकवत हिंडणाऱ्या म्हातार्याने जन्मच बीन घराचा काढलेला असतो, 
त्याच्या जाण्यानं मात्र सारा मोहल्ला का रडत असतो?   

चंद्र म्हणे उगवतो तिथेही अन् वार्यातही गारवा येतो 
धारावीतल्या बसकट छपरांवरही दयाळ पक्षी तसाच गातो! 

- डॉ अतिंद्र सरवडीकर

No comments:

Post a Comment