Monday, 2 June 2025

रियाज

 

एकवटू दे सगळ्या जाणिवा रियाज करताना, 

कशाचाही नको अडथळा सूर शोधताना।


काळ व्हावा मंद थोडा अन् पडावा चिंतेचा विसर,

स्वतःलाही विसरून जावं असा रहावा गहिरा असर ।


मनाची कवाडं गच्च बंद होऊ देत जगासाठी,

ओंकाराचे कोंब गात्रा गात्रातून फुटण्यासाठी ।


त्या कोंबाचं होऊ दे झाड, झाडाचा वटवृक्ष,

वृक्षाचं मग अरण्य होऊ दे माझ्याही नकळत।


तिथल्याच एखाद्या बोधी वृक्षाखाली,

होऊ दे साक्षात्कार अस्तित्व माझं उजळत ।


प्रश्नांचा मग गोफ सुटू दे, द्वंद्वाचा अवघड घाट सरु दे,‌

इर्षा, हेवा मागे पडून स्वतःची सुंदर वाट मिळू दे  । 


अर्थ लागो साऱ्या क्रियांचा, व्याप सरो नुसत्या करण्याचा,    

'मी' माझे पण गळून पडता; स्पर्श होवो नव सृजनाचा । 


सूर नको नुसता गळ्यातून, गात्र गात्र सळसळू दे ! 

अस्तित्व त्याचं जाणवून भोवती, कण कण खळबळू दे । 


शब्दापलिकडचं सांगायचं ते उमटू दे अलगुज! 

कारुण्य, वेदना, तळमळ निववून अवघं फिटू दे ऋण |


श्रोताही भारावू दे मग जाणवून ती संवेदना... 

मंचावर ही साथ राहू दे, मनोभावे केली साधना...


मग रियाजच व्हावा नामजप अन् रियाजंच व्हावा दिंडी,

शांतवून अवघ्या अस्तित्वाला रियाजंच व्हावा मुक्ती...


- डॉ अतिंद्र सरवडीकर ©