Saturday, 13 May 2023

ऋण

 दीप लागो अंतरात, मार्ग दिसो त्या प्रकाशात,

जाणिवांचे घुमो आर्त, कृतींमधले गळो स्वार्थ,

जीवनाचा कळो अर्थ, चालणे त्या ठरो सार्थ,

ध्यास राहो तन मनात, ध्येय मोठे अंबरात,

मीपणाची सुटो गाठ, दिव्यत्वाची मिळो वाट,

शाश्वताची पटो खूण, अस्तित्वाचे फिटो ऋण.

- डॉ अतिंद्र सरवडीकर 

"करवत"

एक मित्र ठरू शकतो भारी

हजार शत्रूंवर कधीही! 


त्याला आत बाहेर असतं माहीत सगळं आपल्या बद्दल

माय, बाप, बायको अन नातलगांहून ही जास्त काही ! 


कधी कधी थट्टेतच तो अणकुचीदार शब्दांची अन् कृतीची करवत फिरवत राहतो. उमाळ्यानं भरलेल्या आतड्यावर... 

फिरवत राहतो.


दुष्मनावर प्रतिहल्ला करता येत असतो 

दोस्ताकडे मात्र केवळ बघता येतं, 

कारुण्य भरल्या नजरेनं... 


 - डॉ अतिंद्र सरवडीकर 

Wednesday, 3 May 2023

झाडं 🌿

 निष्पाप माणसं उभी राहतात चुपचाप... 

मारलं जरी कुणी कोपर आणि काढला जरी चिमटा, विनाकारणच! 

शब्दाच्या, कृतींच्या सुऱ्या भोसकत राहतात त्यांना... 
परके अन आपले सगळेच करतात रक्तबंबाळ,
सहजच! 

निष्पाप माणसं हसत राहतात मंद... 
डोळ्यातलं पाणी दडवत आणि ओठातला शब्द चावत, 
भेदरलेला! 

त्यांच्या चांगुलपणाची दखल घेतं कोण ? 
नसतं करत कुणी कौतुक किंवा सत्कार,
प्रांजळपणाचां! 

स्वतःला कमी लेखत संकोचूनच निघून जातात ती एक दिवस... 
रानातला एक एक वृक्ष म्हणे सुकून जातो तेव्हा, अचानकच! 

जंगलं संपतायत ते उगाच नाही! 
त्यानंतर उरेल फक्त वाळवंट...

झाडं जपायला हवीत ना ! 

- डॉ. अतिंद्र सरवडीकर 

सृजन

 ध्यान जळातून उठूनी बसली क्षणभर तिची वीणा ही थांबली,

आदिमाया सुरेश्वरीची जपमाळा ही जरा विसावली । 


उदंड जाहले गायक बघुनी हसली देवी माता,

हंसवाहिनी वीणाधरिणी पाही डोकावुनिया ।


जो तो इथे महान झाला, अर्ध्या हळकुंडाने न्हाला,

स्पर्धेेमधल्या हलकल्लोळाने, राग - श्रुतींचा सूर्य बुडाला ।


गाणं म्हणजे खेळ शो-बाजीचा, नाद गोंगाटात बदलला,

झुंजी मधल्या कोंबड्यागत गायकाला गायक भिडला ।


सूर म्हणजे तर गंध फुलाला, जसा सहारा दिप ज्योतीला,

दैन्य गांजते खऱ्या साधका; ओळखण्या त्या रसिक विसरला !


तू मोठा की मी मोठा ? हाच प्रश्न केवळ उरला आता!

ज्याच्यापाशी प्रसिद्धी पैसा तोच ठरला आणखी मोठा ।


दीप निमाले तिमिर पसरला...अंधारी त्या मार्ग हरवला...

ध्यान साधना युगा युगांची, सूर सरींचा ओघच अटला... 


हताश झाली ब्रह्मकुमारी, श्वेत वसनी विद्यादायिनी,

जाऊन बसली निज एकांती,ध्यान मग्न जपमाळा धरुनी। 


करीची वीणा दूर ठेवली, करुणा भाके प्रजापतीची,

गोंगाटाचा अस्तं होऊनी, ओंकाराच्या नव सृजनाची । 

- डॉ अतिंद्र सरवडीकर 

Wednesday, 15 June 2022

फेरा

(१)

 आपल्यातलं माणूस आपल्यातून जातं, म्हणजे काय होतं? या क्षणी असलेलं त्या क्षणी नसतं, कुठे जातं? 


वचनं, स्पर्श, सवयी, स्वप्नं यांचं काय होत असेल? 

मनाचा अनंत व्यापार क्षणात कसा थांबत असेल? 


शास्त्र सांगतं शरीराची होत असते माती अन् राख, 

कुठे जाते पण सांगा , मनामधली अमीट आस? 


आपल्यातला एक चेहरा गायबच होतो थेट! 

कधीतरी कुठेतरी होत असेल का पुन्हा भेट ? 


आत्मा म्हणे अमर असतो, जन्म-मरणाचा फेरा असतो, 

फेऱ्यांमध्ये काय साधतो ? मीपणाचा दंभ मिरवतो!  


असतील कळत का सगळी गुपितं पैल तीरावर?

असतील लागत सगळे संदर्भ घडलं जे जे आजवर? 


देव भेटल्यावर आपल्याशी काय बरं बोलत असेल?  

थकल्या जीवाची ऐकून कहाणी की नुसता मंद हसेल ? 


पुण्य ज्याला म्हणतो आपण, पुण्यच असेल का त्याच्या लेखी ? 

की पापाचा घट भरल्यावर झालेली असते गच्छंती?  


-०-०- 

(२)

 स्वर्गातील सुख उत्कट भोगुनी, 

आत्मा जाई जन्म विसरूनी, 

सृष्टी मधला व्यर्थ पसारा,

नकोच म्हणे जाणे फिरूनी। 


तिथेच प्रकटे मायादेवी, 

भाग्य कोरते हळूच भाळी, 

फिरून भूवरी धाडून देई, 

नव्या शरीरी नवी कहाणी... 


परतून पुन्हा जग संसारी या, 

बाळ चिमुकले हमसून रडते, 

पुन्हा उसासे, तीच रहाटी!

खेळावरती मग खुदकन हसते! 


                  - डॉ अतिंद्र सरवडीकर

शाळा

 

शाळेच्या वाटेवर सुखाचा फुलोरा, 
इवल्याश्या बाळमुठीत सुटणारा पारा । 

आठवणींची गर्दी, होतं जीवाचं पाखरू, 
चल दोस्ता सोबतीनं त्याच बाकावर बसू  । 

अंगत - पंगत, सहली, रंगल्या उदंड, 
किती पैशात कुठे आता मिळती हे आनंद? 

तिथली शिकवण, साठवण, मज्जा, 
जीवनाचा भाग बनते कायमचा सर्वांच्या। 

आठवणींची भरली ओंजळ आयुष्याला पुरते, 
कुपी उघडता अत्तराची कण कण घमघमते । 

धावत्या काळात हे विसाव्याचे बिंदू ठरती, 
रणरणत्या उन्हात जणू चांदण्या लुकलुकती । 

गेले ते गेले न मिळते परत ! 
परी शांत एका क्षणी तोच चाफ्याचा दरवळ... 

                                      - डॉ अतिंद्र सरवडीकर

Tuesday, 14 June 2022

तुका झाला हो मंदिर...

तुका झाला हो मंदिर, रोम रोमी पांडुरंग, 

कसे चालता बोलता, घुमू लागले मृदुंग  ।

त्या मृदुंगाच्या नादी, लावतो समाधी, 

गजर घुमवी, विठोबा रखुमाई। 

घर फुंकले सहज, पोरा बाळा नागविले, 

विठ्ठलाने का उगाच, त्याचे अभंग तारियेले ! 

जन निंदती नासती, घाव वर्मीचे घालती, 

सारे देखोनी पाहुनी, थरारते रखुमाई । 

कष्ट सोसतो अनंत! तरी जीव साधा भोळा, 

त्याच्या भावाचा भुकेला, पंढरीचा लेकुरवाळा। 

तळतळून हाकी, संसाराचा गाडा, 

बसता उठता आवली शापते विठ्ठलाला । 

तुका किर्तनी बैसला, सवे विठू नादावला, 

शब्द - भाव - रस घट, जनी वाटून टाकला।

त्याच्या शब्दात अमृत, वेद शरण होतात, 

उरा उरी भेटण्यास, थेट विठोबा देहूत । 

जिणे वादळी प्रपात, तरी नामाचाच छंद, 

त्याच्या ओढीनेच अगा, झुरलाय शिरिरंग। 

त्याच्या प्राणातला टाहो, पार आकाशी भिडला, 

भक्तिभावात विरून, तुका वैकुंठी चालला ।  

दुजाभावच संपला, तुका विठूत निमाला, 

त्याच्या भक्तीची पताका, तिने कळस गाठला। 

तुका झालासे कळस, ज्ञाना पायासी आधार, 

नामा चोखा गोरा जना, मंदिराच्या भिंती चार। 

ऐसे मंदिर ठाकले, त्यात वास करी विठू, 

जग तेथून चालले, म्हणूनची नित्य स्मरू। 

                - डॉ अतिंद्र सरवडीकर