ही आर्त विराणी कुठली ?
ही चंद्रपारची वाणी ?
डोळा अलगद दाटे,
प्राणास फुटली गाणी ।
मूक संध्या समयी,
गहन धुक्याच्या वेळी,
रेखाटत बसली जोगीण,
ध्यानस्थ स्वरांच्या ओळी ।
आंदोलन स्वरगंगेच्या,
डोहात उतरले थोडे,
दिक्काला पैल निघाले,
चंद्रप्रभेचे रावे ।
कृष्ण बनातून फुलले,
त्या गीत फुलांचे झेले,
गंध दरवळे अवघे,
विश्व मोहुनी गेले ।
एकट कातर समयी,
त्या चंद्र भारल्या वेळी
जोगीण उतरण तुडवी,
तो चंद्र माळुनी केशी।
लेऊनि शुभ्र भगवेसे,
'अलख' जागते वारे,
अनिवारश्या ओढीने,
सूर चालती मागे …
- अतिंद्र सरवडीकर
(गुरुवर्य डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित कविता)
२९ डिसेम्बर २०१३. पहाटे ३